डोळे गच्च बंद करून फक्त या वाऱ्याचा आवाज ऐकावासा वाटतोय ,वाऱ्याचा स्पर्श पूर्ण देहाला नवीन स्वरूप देतोय.असं वाटतंय कि बास, आता काहीच नको आयुष्याकडून ...फक्त मी आणि हा वारा..आणि हा वारा जिथे जाईल तिथे त्याचाबरोबर वाहत सुटावं.कुठे थांबूच नये. कुठल्याही कारणासाठी नाही आणि कुठल्याही वेळेसाठी नाही..कारण जर थांबले तर थांबलेल्या त्या वेळेला मला किंमत द्यावी लागेल. आणि ती वेळ कशी असेल ते माहित नाही.आज चांगली तर उद्या वाईट. वेळेचा काही भरोसा नाही .वाऱ्याच तसं नाही.तो सतत फिरतच असतो. दिशा कोणतीही असली तरी वाहता येतं.रोखणार कुणीही नसतं.खरं पाहता वाऱ्यासारखा जगणं सोप्पं आहे.दिशाहीन फिरण्यात देखील गम्मत असलेच कि नाही.मुळात दिशाहीन असं काही नसतंच माझा मते.आपल्यासाठी चुकलेल्या दिशेला आपण दिशाहीन म्हणून मोकळे होतो. किती conveniently आपण ठरवतो कि कशाला किती महत्व द्यायचं आणि कशाची काय व्याख्या करायची ते.आपल्या विचारांची पण गम्मत असते .कधी कधी आपण आज उद्याचा इतका विचार करतो कि 'आत्ताचा' विचार राहूनच जातो कि. माझंही काहीसं तसंच होतंय.आत्ता वारा म्हणतोय कि चल बघू माझाबरोबर.छान हवं तितकं फिर. निवांत! कशाचीही फिकीर न करता , कुठल्याही बंधनांचा विचार न करता,'उद्या हे करायचं आणि परवा ते' या सगळ्या विचारांना मागे सोडून....चल!पण वेळ थांबवतेय.तिचं म्हणणं आहे कि वारा हा असाच फिरत राहणार,कुणास ठाऊक उद्या हा वारा तुझाबरोबर असेलच का? तो जाईलच कि त्याचा दिशेने.आणि हे असं तू किती वेळ फिरणार?कधीतरी कुठेतरी थांबावं लागेलच ना?मग तेव्हाचा वेळेला काय उत्तर देणार? त्यापेक्षा आत्ता थांब , मी बदलेन.आज वाईट वेळ जरी चालू असली तरी उद्या मात्र नक्कीच चांगली वेळ येईल. थांब इथे आणि धैर्याने वाईट वेळेला सामोरं जा, वाऱ्याबरोबर अशी पळू नकोस.
पण वाऱ्याचा हा मुक्तपणा, हा स्पर्श मोहात पाडतोय मला सगळं काही विसरून वाहायला.पण वेळ ,तिचं काय? वारा फक्त आत्ताचा क्षण देतोय मला असं मोकाट जगायला,उद्या तोही वेळेसमोर झुकला तर?उद्या कदाचित वेळ असेलही माझाकडे पण वारा नसला तर? ..मला दोन्ही हवंय..वाऱ्याबरोबर वाहणं पण आणि स्वतःला रोखू शकेल अशी वेळ पण.हा ना माझ्यासारख्या कन्या राशी वाल्या लोकांचा गोंधळच असतो नेहमी.दोन गोष्टींमधली एक गोष्ट काही निवडता येत नाही.पण मी वाऱ्याला सांगितलंय जरी मी आत्ता तुझाबरोबर वाहू शकले नाही तरी हा वाहण्याचा गुणधर्म नक्की मला देऊन जा,निदान 'मी देखील कधीही वाहू शकते' हे 'वाईट वेळेला' सांगून blackmail तरी करता येईल .