Wednesday, July 2, 2014

एका संधीचा शोधात...

एका विचित्र वळणावर आलेय मी , थांबताही येत नाही आणि वळून पाहताही येत नाही .सतत चालत रहावं लागतंय दिशाहीन, पाय फुटेल त्या रस्त्याला...एका संधीचा शोधात. खरतर किती अधांतरी आहे हे दिशाहीन चालणं....म्हणजे कदाचित सुख , आनंदाने भरलेला गुलदस्ता माझी वाट पाहतोय असं असेलही किंवा त्रास, दुख्ख यांच काट्यांनी गुंफलेला जाळ...कोणी पाहिलंय पुढे काय मांडून ठेवलंय.. आपण मात्र चालत राहायचं एका संधीचा शोधात..दिवसा बरं असतं, निदान प्रकाशात काही आशा , हुरूप तरी जन्माला येतात.रात्रीचा काळाकुट्ट अंधारात मात्र काहीच दिसत नाही ..जिथे फक्त डोळे गच्च बंद करून स्वप्न पहायची थोडीफार अपेक्षा करता येते...पण एका संधीचा शोधात माणसं मात्र अनेक भेटतात.नशिबाने चांगली माणसं मिळाली तर ते योग्य मार्ग तरी दाखवतात नाहीतर तसंही बाकीचे स्वतःच रस्ता चुकलेले असतात.आपला मात्र प्रामाणिक प्रयत्न चालू असतो ती एक संधी मिळवण्यासाठी पण लोकांची दुनियादारी पाहून मन आपलंही विचलित होतंच.पण त्या विचलित मनाला रोखायचा कि धावू द्यायचा ते मात्र आपल्यावर असतं.त्या एका संधीचा शोधात आपण मैलोंमैल चालतो तहानभूक विसरून ...एकटेच..खरतर विचार , माणूस, सावली असं हे त्रिकुट मात्र कायम एकत्र असतं .दिवसा रात्रीचा प्रकाशाप्रमाणे सावलीचा आकार बदलत असतो, प्रत्येक वाटेवर मिळणाऱ्या अनुभवांवरून विचार बदलतात आणि माणसाचा काय आहे...तोही बदलतोच की..चातक पक्षी जसा पावसाची वाट पाहतो तसं झालंय माझं, स्वतःला सिद्ध करायला एक संधी मिळावी म्हणून त्या चातकाप्रमाणे संधीची वाट पाहतेय मी. सावलीचं एक बरं असतं ती असते सतत बरोबर .पण मला एक कळत नाही की माझा या अशा निरर्थक शोधात का ती साथ देत असते माझी?काय मिळणारय  शेवटला?माझा बरोबर सावलीही विरूनच तर जाणाराय...पण मग जाणवला की हि सावली खरतर आपलाच दुसरं रूप असतं. आपल्या विचारांना मजबूत करण्यासाठी जसं आपल्याला दुसऱ्यांचा पाठिंब्याची गरज असते त्याप्रमाणे हि सावली आपल्याला पाठीबाच तर देत असते निमुटपणे , कसलंही आमिष दाखवता...ती मात्र  असते सतत सांगायला '"मी आहे तुझाबरोबर  चालत रहा'"...आणि विचारांचं म्हणाल तर ते काही आपली पाठ सोडत नाहीत.चांगले वाईट अशा सगळ्यांच विचारांमध्ये आपण आपल्याला कळण्याआधीच गुरफटून गेलेलो असतो...असंच चालता चालता एक दिवस ती संधी  मिळेलही कदाचित  पण नाहीच मिळाली तर निदान स्वतःला तरी या प्रवासात शोधता आलं हा आनंद नक्की मिळो इतकीच काय ती माफक अपेक्षा  ठेवते...आणि चालत राहते त्या एका संधीचा शोधात...

3 comments:

  1. pure विचारमंथन पण प्रयत्न करायला प्रवृत्त करतंय...छान आहे.

    ReplyDelete
  2. Chalta chalta eka valnavar sandhi ubhi asel donhi haat pasrun tuzyasathi kinva samor ji paristhiti yeil tila sandhi banvanyache bal ani kaushlya deil ha pravaas..

    ReplyDelete
  3. Wow! अक्षता - किती सुंदर लिहितेस तू!

    ReplyDelete